खुशखबर..! राज्यात 75 हजार रिक्त पदांची भरती, राज्य सरकारची मोठी घोषणा..

खुशखबर..! राज्यात 75 हजार रिक्त पदांची भरती, राज्य सरकारची मोठी घोषणा..

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.. महाराष्ट्र विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा केली. येत्या वर्षभरात राज्यात 75 हजार रिक्त पदांची भरती केली जाणार असल्याचे देसाई यांनी जाहीर केले.

राज्य विधी मंडळाच्या अधिवेशनात अरुण लाड यांनी विधान परिषदेत नोकर भरतीबाबत लक्षवेधी मांडली. शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये लाखो पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम सरकारी कामकाजांवर होत असून, सामान्य नागरिकांची अडचण होत असल्याचा मुद्दा लाड यांना मांडला.. त्यावर मंत्री देसाई यांनी उत्तर दिले..

एमपीएससी’मार्फत नोकर भरती

ते म्हणाले, की “कोरोना काळात आरोग्य व वैद्यकीय सेवा विभाग वगळता, अन्य विभागांमधील नोकर भरतीवर सरकारने निर्बंध घातले होते. मात्र, आता राज्यात कोरोनावरील निर्बंध शिथिल झाले असून, पुन्हा एकदा नोकर भरतीची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. लोकसेवा आयोगामार्फत (एमपीेएससी) आकृतिबंधानुसार 100 टक्के रिक्त पदे भरली जातील. तसेच, जिल्हा निवड समितीमार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 50 टक्के रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.”

मराठा समाजातील 2000 पैकी 1200 उमेदवारांना आर्थिक दुर्बल घटकांमधील आरक्षित पदांवर नियुक्त्या देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. ‘एमपीएससी’मार्फत शिफारस केलेल्या 3000 उमेदवारांना नियुक्त्या दिल्या जात आहेत. याआधी नोकर भरतीत अनियमितता केलेल्या खासगी कंपन्यांचा समावेश या भरती प्रक्रियेत केला जाणार नाही,” असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले..