मुंबईत परप्रांतीयांसाठी रोजगार कार्यालय ?

- गायत्री घुगे.
महाराष्ट्र रोजगार वृत्त - प्रतिनिधी
सहाय्य - प्रज्ञा मेस्त्री
सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना कसे उधाण आले आहे हे काही कोणाला वेगळे सांगण्याची गरज नाही. सर्व वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया, वर्तमानपत्रे सर्व ठिकाणी किरीट सोमय्या, संजय राऊत, राणा दांपत्य हे शब्द जरा जास्तच ट्रेडिंग आहेत. आणि त्यातच महत्त्वाचा प्रथम स्थानावर ट्रेडिंग असलेला शब्द म्हणजे भोंगा... आता याबद्दल काही वेगळे सांगायची गरज नाही. परंतु हे सर्व राजकारण सामान्य जनतेला कितपत आवडत आहे याचा मात्र कोणी विचार करत नाही. आणि या सर्वांमध्ये भर घालणारा अजून एक मुद्दा म्हणजे योगी सरकारचे मुंबईतील कार्यालय...
दिनांक 10 मे 2022 रोजी सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर भारतीयांसाठी उत्तर प्रदेश चे कार्यालय हे मुंबईमध्ये उघडणार अशी घोषणा केली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्यावर अजूनही कोणत्याच राजकीय पक्षांनी किंवा कोणत्याही नेत्यांनी त्यांचे मत मांडले नाही. असे का ? त्यांना हा निर्णय मान्य आहे का ?
महाराष्ट्राची राजधानी मुंबईची लोकसंख्या ही 1.84 कोटी आहे. त्यापैकी 50 - 60 लाख उत्तर भारतीयांनी मुंबईमध्ये शिरकाव केला आहे. 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार हा आकडा 40 टक्क्यांनी वाढला होता. 2001 मध्ये ही संख्या 25.88 लाख होती. मुंबईमध्ये परप्रांतीयांचा शिरकाव हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे असे ठळकपणे दिसून येत आहे. आणि त्यातच योगी आदित्यनाथ यांनी यूपी चे कार्यालय हे मुंबईत राहणाऱ्या यूपीमधील कामगारांच्या नोकऱ्या, व्यवसाय आणि सोयी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी उघडणार असे सांगितले आहे.
एकेकाळी मुंबई कुणाची अशी आरोळी आसमंत व्हायची आणि एकच जयघोष व्हायचा तो म्हणजे मुंबई मराठी माणसांची... परंतु याच मुंबईमधून आता मराठी माणसांचा टक्का हळू हळू घसरत चालला आहे. आणि हिंदी भाषिकांचा टक्का हा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे. कित्येक वर्षांपासून मराठी माणूस करत असलेल्या पारंपारिक व्यवसायांमध्येही आता या परप्रांतीयांनी शिरकाव केला आहे. कोळी बांधवांचा मच्छीमारी, माथाडी कामगार, छोटे मोठे व्यवसाय, फळ-भाजी व्यवसाय तसेच प्रत्येक मार्केटमध्ये देखील उत्तर भारतीयांनी त्यांचे पाय रोवले आहेत.
एका सर्व्हेनुसार जानेवारी 2022 मध्ये महाराष्ट्रातील बेरोजगारीचा दर 4.22 टक्के होता. तसेच जानेवारी 2022 मध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण बेरोजगारीचा दर 3.06 टक्के होता. दरवर्षी मुंबईत परराज्यातून नोकरीच्या शोधात लोकांचे लोंढेच्या - लोंढे येतात आणि मिळेल ती जागा, मिळेल ती नोकरी करत ते इथे स्थायिक होतात. आता हा परप्रांतीय महाराष्ट्रातील सर्वच व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रांमध्ये आपले पाय रोवत आहेत. आणि त्यांचे सरकार म्हणजे योगी आदित्यनाथ हे स्वतः आता प्रोत्साहित करीत आहेत. आणि या उत्तर प्रदेशातील नागरिकांमुळे महाराष्ट्रातील तरुण वर्ग पिछाडीवर पडला आहे. अश्या या मराठी वर्गासाठी महाराष्ट्र सरकार आता नक्की काय पाऊल उचलणार ? आणि जर उत्तर प्रदेश राज्यामधील नागरिकांसाठी या सुविधा मुंबईमध्ये होत आहेत तर, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी काय सुविधा होणार ?