प्रेरककथा

प्रेरककथा

"'जिना'" 

आज एका हॉस्पिटलचा जिना घाईघाईने चढत होतो, पंधराएक पायऱ्या असतील! माझ्या पुढे कठडा पकडून उजव्या हातात दोन पिशव्या सांभाळत एक साठीच्या आसपासचे गृहस्थ हळूहळू जिना चढत होते. किरकोळ शरीरयष्टी, अंगात मळकट शर्ट, साधीशी पॅन्ट! 

सहसा मी असं कधी करत नाही, पण आज का कोणासठावूक वाटलं आणि मी मागून त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो, "द्या इकडे पिशव्या!" 

त्यांनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं, एकंदरीत माझे कपडे, डोळ्यांवर राहून गेलेला गॉगल, आणि तसं पाहता माझं वय... मी देखील गेलोय की पन्नाशीत! म्हणजे आमच्या वयात फारसं अंतर नसावं!

"असू द्या!" ते संकोचून म्हणाले. तरी मी पिशव्या घेतल्या, त्यांनी अजून विरोध करू नये म्हणून भराभर पायऱ्या चढलो आणि वर जाऊन उभा राहिलो. ते जिना चढताना माझ्याकडे पाहून छान हसले. जवळ आले, पिशव्या माझ्याकडून घेतल्या , खाली जमिनीवर ठेवल्या. आणि माझ्या दोन्ही खांद्यावर अलगद हात ठेवले.

"बायको सिरीयस आहे माझी, खूप नाजूक अवस्थेत आहे, पण आत्ता पायऱ्या चढताना वाटलं... जगेल ती, अजून जगात आहे चांगुलपणा शिल्लक!" 

सरसरून काटाच आला अंगावर... किती किरकोळ, साधी, क्षुल्लक गोष्ट वाटते आपल्याला, पण घेणारा त्यातून काय, कसं घेईल हे सांगता येत नाही! 

आज मनोमन ठरवलं... कोणी दखल घेऊ दे वा न घेऊ दे, निरपेक्ष वृत्तीने जमेल तितकं दुसऱ्यासाठी करत राहायचं...

 आयुष्याचा जिना चढत असताना असंच जमेल तितकं दुसऱ्याचं दुःख हलकं करायचा प्रयत्न करायचा! वरच्या टोकाला पोहोचल्यावर जे समाधान मिळेल, तोच तर स्वर्ग की! 

 ✍️ लेखक :- "डॉ.अमित बिडवे" 

'ऑर्थोपेडिक सर्जन', 

(पोस्ट शेअर करू शकता)